अमरावती जिल्ह्यात सावकारी कर्जाचा विळखा घट्ट

264 कोटींचे कर्ज आणि बळीराजा हतबल

* दोन लाख नऊ हजार शेतकरी अडचणीत

* बँकांच्या जाचक अटींमुळे सावकारांचे फावते

अमरावती / 29 मार्च – जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नसून, यामागील प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या सावकारी कर्जाचे जाळे आजही तितकेच मजबूत आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसारख्या अनेक योजना जाहीर करूनही बळीराजा या संकटातून बाहेर पडू शकलेला नाही. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्ह्यात तब्बल 264 कोटी रुपयांचे सावकारी कर्ज वितरित झाले आहे.
शेतीसाठी पीक कर्जाची सोय असूनही बँकांमधील कागदपत्रांची जटिलता, कामात होणारा उशीर आणि निकड भासल्यावर वेळेत पैसा न मिळणे, यामुळे शेतकरी नाईलाजाने सावकाराच्या उंबरठ्यावर उभा राहत आहे. शेती आणि इतर गरजांसाठी विनाकारण वेठीस धरले गेल्याने जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 9 हजार कर्जदारांच्या दारात 667 सावकार उभे ठाकल्याचे चित्र समोर आले आहे. सहकार विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यात परवानाधारक सावकारांचे मोठे जाळे असून त्यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक 250, तर अचलपूरमध्ये 153 सावकार आहेत. सर्वात कमी संख्या भातकुली तालुक्यात असून तिथे केवळ 7 सावकार नोंदणीकृत आहेत. या व्यतिरिक्त मोर्शी 33, अंजनगाव सुर्जी 23, धामणगाव रेल्वे 33, वरुड 44, धारणी 21, नांदगाव खंडेश्वर 14, चांदूर रेल्वे 10, चांदूर बाजार 43, तिवसा 9 आणि चिखलदरा तालुक्यात 8 सावकार कार्यरत आहेत. शासनाने बिगर तारण कर्जासाठी 12 टक्के आणि तारण कर्जासाठी 9 टक्के व्याजदर निश्चित केला असला तरी, प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त दराने वसुली केली जात असल्याची ओरड आहे. बँकांची कर्ज प्रक्रिया लांबत असल्याने ग्रामीण भागातील गरीब शेतकरी ’तात्काळ पैसा’ मिळवण्यासाठी या चक्रव्यूहात अडकत चालला आहे.
सावकारी पाशाचा असा आहे लेखाजोखा-जिल्ह्यात एकूण 264 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. यात बिगर-शेती कर्जासाठी 1 लाख 4 हजार 872 कर्जदारांना 132.15 कोटी, तारण कर्जासाठी 1 लाख 2 हजार 814 जणांना 126.45 कोटी, तर विना तारण कर्जासाठी 2 हजार 58 जणांना 5.70 कोटी रुपये देण्यात आले आहेत. बँकांपेक्षा सावकार जवळचा वाटत असल्याने शेतकरी यात भरडला जातोय.

संबंधित बातम्या

Back to top button