43 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटची संधी

अमरावती/25 मार्च : विदर्भातील नामांकित विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व संशोधन संस्था, बडनेरा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात 43 विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित कंपनीत निवड झाली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील गुणवत्तेला रोजगाराची भक्कम संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना या यशामुळे मोठे यश लाभले असून, यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध ’ईगल हाय-टेक कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीच्या वतीने 24 मार्च 2026 रोजी ही भरती प्रक्रिया पार पडली. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अंतर्गत येणार्या अमरावती, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने भाग घेतला होता. यामध्ये आर. डी. आय. के. महाविद्यालय (बडनेरा), राजाभाऊ देशमुख महाविद्यालय (नांदगाव खंडेश्वर), महिला कला व वाणिज्य महाविद्यालय (चांदूर रेल्वे), इंदिराबाई मेघे महाविद्यालय (अमरावती) आणि समाजकार्य महाविद्यालय (बडनेरा) येथील विद्यार्थ्यांचा समावेश असून, या निवडीमुळे संस्थेच्या रोजगार नोंदणीत मोलाची भर पडली आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंह चौधरी, सदस्य नितीन हिवसे, प्रा. डॉ. पूनम चौधरी, प्रा. विनय गोहाड, पंकज देशमुख व प्रा. गजानन काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.




