राजापेठ परिसरातील मनभरी फूडमार्टमधून 80 हजार लंपास

कुलूप तोडून रोकड पळविली; बंदोबस्त असतानाही धाडसी चोरी

अमरावती /25 मार्च : शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका प्रसिद्ध उपाहारगृहात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारून 80 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. ’मनभरी फूडमार्ट’ या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी हा हातसाफ केला असून, या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. बडनेरा मार्गावर असलेल्या या दुकानात गेल्या दोन वर्षांपासून उत्तम नगर येथील रहिवासी बंडू नामदेवराव पायडे (वय 23) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम आटोपून त्यांनी दुकान नीट बंद केले आणि ते घरी निघून गेले. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रविवारी सकाळी 11 वाजता जेव्हा पायडे हे दुकान उघडण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. आत जाऊन पाहिले असता, पैशांच्या गल्ल्यातील सुमारे 80 हजार रुपयांची रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व्यवस्थापक बंडू पायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button