भीमस्वरांनी दुमदुमणार अवघी अमरावती नगरी
इरविन चौकात क्रांती गीतांचा जागर

मोहन इंगळे यांची विक्रमी मानवंदना
अमरावती/12 एप्रिल– भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून अमरावतीतील ऐतिहासिक इरविन चौकात ’एकता रॅली’च्या वतीने एका भव्य स्वरसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ख्यातनाम प्रबोधनकार प्रा. मोहन इंगळे हे आपल्या दमदार आवाजात ‘तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’ ही क्रांतिकारी भीम-बुद्ध गीते सादर करणार असून, त्यांच्या प्रबोधन प्रवासातील हे 5131 वे ऐतिहासिक सादरीकरण ठरणार आहे.येत्या 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता एकता रॅलीच्या विशाल मंचावर हा कार्यक्रम रंगणार आहे. गेल्या दोन दशकांपासून आपल्या सुरेल आवाजातून समाज जागृतीचे कार्य करणारे प्रा. मोहन इंगळे आणि त्यांचा ‘भावस्वरांजली संगीत समूह’ भीम-रमाई गीते, बुद्ध वंदना आणि फुले-शाहू-शिवरायांच्या विचारांचा वारसा संगीतातून उलगडणार आहेत. यात गायक-वादकांची मोठी फौज असून निवेदक दिलीपभाऊ सरदार, पार्श्वगायिका शीतल तायडे, डॉ. श्वेता मोहन इंगळे आणि प्रा. दीक्षा सरदार यांचा स्वर लाभणार आहे. वाद्यवृंदात रवी इंगोले, श्रीकांत तायडे, श्याम डोंगरे, संतोष मानकर आणि भीमरावजी काळे आपली कला सादर करतील. या सोहळ्यासाठी राजू नन्नावरे, सुरेखा नन्नावरे, चंद्रकुमार जाजोदिया, लप्पी सेठ, सुदर्शनजी जैन, तुषार वरुडगावकर, राजेश फुले आणि अशोकजी खंडारे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




