लोकशाही दिनात दाखल प्रकरणांचा निपटारा तत्काळ करा
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश

अमरावती/11 मे: लोकशाही दिनात येणार्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. सर्व प्रलंबित कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करा, अशा कडक शब्दांत विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश दिले असून, लोकांच्या तक्रारींवर प्रशासनाने आता अधिक संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे ठणकावून सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत एकूण 14 तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नयना गुंडे यांनी प्रत्येक अर्जाची बारकाईने माहिती घेऊन त्यातील अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. यापैकी 4 तक्रारींचा जागीच निकाल लावण्यात आला असून, उर्वरित 12 अर्जांबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, तक्रारदाराला केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देणे आता बंधनकारक असेल. महसूल, पोलीस, महानगरपालिका, सहकार, कृषी आणि ऊर्जा विभागाच्या अधिकार्यांनी आपल्या कामात गती आणून जनतेला दिलासा द्यावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, उपायुक्त राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे आणि गीता वंजारी उपस्थित होत्या. पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. जुन्या तक्रारींचा पाठपुरावा करून त्या पुन्हा नवीन लोकशाही दिनात येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबतही वेळेत अहवाल देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या असून, प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.




