विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींनी वेधले लक्ष

जनता विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव

अंजनगाव बारी/13 सप्टेंबर : दि. 12 सप्टेंबर रोजी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शाडू मातीपासून गणपती मूर्ती तसेच बैल तयार करण्याचा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक गजेंद्र अवघड व पर्यवेक्षिका मनीषा चिंचोळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बैलपोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून सुंदर देखावे सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले बैल तसेच शाडू मातीपासून बनविलेल्या नक्षीदार गणेशमूर्ती प्रदर्शित करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत गणपती मूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेत इयत्ता सातवीचा नैतिक गबने याने प्रथम क्रमांक मिळविला. तर बैल तयार करण्याच्या स्पर्धेत इयत्ता सातवीचा ओम गबने याने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना मुख्याध्यापक गजेंद्र अवघड, पर्यवेक्षिका मनीषा चिंचोळकर तसेच शिक्षकवृंद यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापकांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कलात्मक कौशल्यांना तसेच सांस्कृतिक परंपरांविषयीच्या जाणीवेला चालना मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. संपूर्ण नियोजन व आयोजन जयश्री पवार आणि राजुदास राठोड यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

Back to top button