बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा पारंपारिक पध्दतीने साजरा

चांदस वाठोडा / 3 सप्टेंबर – बळीराजाच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊन, वारा, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता वर्षभर शेतकर्यांसोबत शेतात राबणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बैलपोळा सण चांदस-वाठोडा येथे मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
चांदस-वाठोडा येथील बेल नदीच्या तीरावर गेल्या अनेक वर्षांपासून बैलपोळ्याचा पारंपरिक सोहळा भरत आहे. यंदाच्या पोळा उत्सवात वाठोडा येथील सुमारे 35 तर चांदस येथील 27 बैलजोड्यांनी सहभाग घेतला. यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
चांदस येथील शिवाजी देशमुख यांच्याकडून गुढी घेऊन येणारे किसना बारेदार, तसेच नितीन देशमुख यांच्याकडून गुढी घेऊन येणारे किशोर बारस्कर यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. सर्व बैलांना घाट पाजल्यानंतर पारंपरिक पद्धतीने तोरण तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.वाठोडा येथील रामदास बोकडे व प्रशांत दळवेकर यांनी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक वेशभूषा करून वाजत गाजत बैलांना घाट पाजत पोळ्याची परंपरा जोपासली. यावेळी लक्ष्मी देवस्थानच्या वतीने बैलमालकांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच शेतकर्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण असलेल्या बैल पोळ्यानिमित्त बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्या वतीने सर्व बैलधारक शेतकरी बांधवांना भेट वस्तू देण्यात आल्या. गुढी घेऊन येणारे मानकरी व बँड पथकांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान चांदस व वाठोडा येथील तरुणांनी खंड बोलून उपस्थितांचे मनोरंजन केले तसेच महादेवाच्या आरत्याही घेण्यात आल्या. पारंपरिक संस्कृती, श्रद्धा आणि शेतकरी जीवनाशी जोडलेला हा उत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बैलपोळा उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी वाठोडा ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील व संबंधित अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.





