अमरावती महापालिकेत धक्कादायक निकाल; कोणालाच बहुमत नाही
भाजपचे 25 जागांवर कमळ फुलले

* युवा स्वाभिमान 15 तर काँग्रेसचीही 15 जागांवर झेप
* एमआयएमची 12 जागांवर मुसंडी
* अपक्ष आणि लहान पक्ष बजावणार मोलाची भूमिका
* कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने सत्तेसाठी मोठा पेच
अमरावती /16 जानेवारी – गुरुवारी झालेल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतरच, शुक्रवारी मतमोजणी शांततेत पार पडली. सकाळी 10 वाजता पासून 22 प्रभागातील मतमोजणीला प्रारंभ झाला.सर्व प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील जनतेने कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट जनादेश देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
त्यामुळे महापालिकेवर संमिश्र पक्षाच्या गठबंधनानंतर सरकार स्थापन होईल.असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे मामेभाऊ विवेक कलोती व साईनगर प्रभागातील तुषार भारतीय यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने, महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबतची राजकीय अनिश्चितता अधिकच गडद झाली आहे. 87 सदस्यीय महानगरपालिकेत 25 जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी, बहुमतापासून तो अजूनही दूर आहे. दरम्यान, युवा स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष 15 जागांसह दुसर्या स्थानावर आहेत. शिवाय, एमआयएम 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी प्रत्येकी 11 जागा जिंकून जोरदार कामगिरी केली आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) 3, बसपा 3, शिवसेना उबाठा 2 आणि वंचित बहुजन आघाडीने 1 जागा जिंकली आहे. परिणामी, महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी खेळण्यात येणार्या हालचालीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. वरील निवडणूक निकालांवरून, अमरावती महानगरपालिका निवडणुकीत कोणताही एक पक्ष सत्ता मिळवू शकणार नाही हे स्पष्ट आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी, बहुमत नसल्यामुळे त्याला युतीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, एआयएमआयएम, युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे असलेल्या जागांच्या आकडेवारीवरून कोणत्या पक्षाची सत्ता स्थापनेसाठी युती होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान शिंदे गट, शिवसेना, बसपा आणि इतर लहान पक्षांची भूमिका देखील निर्णायक ठरू शकते. राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की महानगरपालिकेत नगरसेवकांना पाठिंबा मिळवण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठीची रणनीती आता तीव्र होईल. येणार्या काळात शहराच्या राजकारणात मोठे उलथापालथ होऊ शकते. मतदारांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नसल्यामुळे शहराच्या प्रशासकीय स्थिरतेलाही आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, घोडेबाजाराची भीती स्वाभाविक आहे. जनतेने बदल आणि संतुलनाचे संकेत दिले आहेत, परंतु आता राजकीय पक्षांनी कुठलाही घोडेबाजार न करता कायमस्वरुपी सत्ता स्थापन करणे महत्वाचे माणण्यात येत आहे.
लहान पक्षांची महत्वाची भूमिका
अमरावतीच्या निकालात छोटे पक्ष आणि अपक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. शिंदे गटाची शिवसेना, बसपा, उबाठा गट आणि वंचित बहुजन आघाडी यासारखे पक्ष सत्ता स्थापनेसाठी कशी मदत करतात याकडे आगामी काळात स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घोडेबाजार होणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे.आगामी काळात महानगरपालिकेची दिशा आणि भवितव्य याकडे सर्वांचे लक्ष.
पक्षनिहाय बलाबल
भारतीय जनता पक्ष – 25
काँग्रेस – 15
युवा स्वाभिमान पार्टी – 15
एआयएमआयएम – 12
रा.काँ. पक्ष (अजित पवार) – 11
शिवसेना (शिंदे गट) – 3
बसपा – 3
शिवसेना (उबाठा) – 2
वंचित बहुजन आघाडी – 1




