शेतकर्यांचे अर्धनग्न आंदोलन
विदर्भासह राज्यात दुष्काळ जाहीर करा

अमरावती आयुक्तालयावर धडकला शेतकर्यांचा आक्रोश
रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकर्यांची घोषणाबाजी
प्रशासनाची उडाली तारांबळ
अमरावती/8 सप्टेंबर- पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण विदर्भासह राज्यात दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर शेकडो शेतकर्यांनी जोरदार धडक दिली. हातात सुकलेली पिके घेऊन आलेल्या शेतकर्यांनी थेट अंगारे पांघरत शर्ट काढून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला, तर पोलिसांच्या अडवणुकीमुळे आंदोलनस्थळी मोठी बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला.
अमरावती विभागात पावसाने मोठा दगा दिल्याने शेतातील पिके पार करपून गेली आहेत. शेतकरी पुरता अडचणीत सापडला असून त्याला तातडीने आधार मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांसह विभागीय कार्यालयावर थेट धडक दिली.
या मोर्चात बुलढाणा, अमरावती परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र आले होते. आंदोलक शेतकर्यांच्या हातात पावसाअभावी वाळलेली सोयाबीन, कापूस आणि तुरीची झाडे दिसत होती. आयुक्त कार्यालयाच्या परिसरात पोलिसांनी लावलेले लोखंडी अडथळे पार करत शेतकर्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलीस आणि शेतकर्यांमध्ये जोरदार झटापट झाली.
शेतकर्यांनी परिस्थितीचे गांभीर्य दाखवण्यासाठी थेट अंगातील कपडे उतरवून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही आंदोलकांनी फटाके फोडून प्रशासनाचे लक्ष वेधले.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पार खचून गेला असून तो मरणाच्या दारात उभा राहिला आहे. आत्महत्यांचे सत्र थांबवायचे असेल तर सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई दिलीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा तुपकर यांनी घेतला. तुपकर यांना राज्यमंत्रिपदाचादर्जा असल्याने प्रशासनाने अत्यंत सावधगिरी बाळगत मोठा पोलीस बंदोबस्त आणि दंगल नियंत्रण पथक तैनात केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तीन पानांचे सविस्तर मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला सोपवण्यात आले. पश्चिम विदर्भात यंदा पावसाअभावी हातची पिके गेली असून शेतकरी पुरता कोलमडला आहे, सरकारने मागण्या मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र लढा उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला.





