भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी
गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक आणि पिकअपची धडक

गोंदिया /8 सप्टेंबर : रोजगाराच्या शोधात घर सोडलेल्या मजुरांवर वाटेतच काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व मजूर हे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कामानिमित्ताने हे सर्वजण पिकअप वाहनाने हैदराबादच्या दिशेने निघाले होते. नागरा परिसरात रात्रीच्या सुमारास समोरून येणार्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की वाहनात बसलेले मजूर आतच अडकून पडले आणि 6 जणांचा तडफडून जागीच मृत्यू झाला.अपघाताचा भीषण आवाज ऐकताच स्थानिकनागरिकांनी आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पिकअपमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतदेहांना मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.





