अमरावतीत 72 किलो गांजा जप्त

टास्क फोर्सने दोघा महिलांसह तिघांना ठोकल्या बेड्या

36 लाखांच्या अमली पदार्थावर पोलिसांची कारवाई

अमरावती/8 सप्टेंबर– शहरात मोठ्या प्रमाणात खपवण्यासाठी आणलेला तब्बल 72 किलो वजनाचा आणि सुमारे 36 लाख रुपयांचा गांजा अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने रंगेहाथ जप्त केला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने रचलेल्या सापळ्यात मुख्य तस्कर नरेश मोहिते याच्यासह त्याच्या दोन महिला साथीदारांना मुद्देमालासह बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे अवैध नशा विकणार्‍या टोळीचे कंबरडे मोडले असून आरोपींविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणपती उत्सवाच्या तोंडावर अमरावतीत गांजाची मोठी खेप उतरणार असल्याची खबर मिळताच टास्क फोर्सचे पथक सतर्क झाले होते. वर्धाजिल्ह्यातील सेलू येथून आरोपी नरेश मोहिते हा दोन महिलांना सोबत घेऊन अमरावती शहरात गांजा पोहोचवण्याच्या तयारीत होता. स्थानिक पातळीवर ग्राहकांपर्यंत माल पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालून तिघांच्या मुसक्या बांधल्या. जप्त केलेला मुद्देमाल आणि वाहनाची कसून तपासणी सुरू आहे.
ही धाडसी कामगिरी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके, नागपूर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. तसेच पोलीस उपअधीक्षक गजानन विखे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक समाधान मचाले, पूनम जगताप व त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्याकडे सोपवला आहे.

Back to top button