83 तालुक्यात पावसाचा मोठा खंड
खरीप हंगाम वाया जाण्याची भीती, शेतकरी चिंताग्रस्त

मुंबई /8 सप्टेंबर : जुलै महिन्यात सर्वदूर हजेरी लावणार्या पावसाने ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. 1 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2026 या दरम्यान राज्यातील 11 जिल्ह्यांत तब्बल 30 दिवसांहून अधिक दिवस पावसाचा खंड पडला आहे. तर चार महसुली विभागांमधील 83 तालुक्यांमध्ये 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घकालीन पर्जन्यखंड नोंदवला गेला आहे. त्यामुळे या भागात विशेषतः मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून पावसाची ओढ कायम राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
कृषी खात्याच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, अडीच मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला कालावधी हा पावसाचा खंड म्हणून ग्राह्य धरला आहे. त्यानुसार अहिल्यानगर आणि पुणे या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक 38 दिवस पावसाचा खंड नोंदला आहे. त्याखालोखाल बुलढाणा, नाशिक, सांगली आणि सातारा या चार जिल्ह्यांत 37 दिवसांचा खंड आहे.
बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांत प्रत्येकी 34 दिवसांचा, तर परभणी जिल्ह्यात 30 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. याशिवाय धुळे, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत 26 दिवसांचा, अकोला आणिवाशिममध्ये 23 दिवसांचा, अमरावतीत 22 दिवसांचा, वर्ध्यात 21 तर नागपूरमध्ये 20 दिवसांचा खंड नोंदविण्यात आला आहे.खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस होतो किंवा कसे, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.





