विखे पाटलांना किंमत मोजावी लागेल!

उपोषणाच्या 11 व्या दिवशी जरांगे आक्रमक

प्रकृती खालावली तरीही उपोषणावर ठाम

वडीगोद्री /8 सप्टेंबर  :  मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदींना न्याय मिळवून देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण आज, मंगळवारी (दि. 8) अकराव्या दिवसात दाखल झाले आहे. प्रदीर्घ उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली असून त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (शुगर लेव्हल) वेगाने खाली आली आहे. उपोषणाच्या या 11 दिवसांच्या काळात त्यांचे सुमारे सात किलो वजन घटले आहे. शारीरिक थकवा वाढलेला असतानाही मंगळवारी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री तथा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत राजकीय तोफ डागली.
आज सकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यांवर तीव्र संताप व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारकडे कायदेशीर मार्ग काढण्याऐवजी दिलेली प्रमाणपत्रे रद्द करणे हाच एक पर्याय उरला होता का? तुम्ही सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला आहात. अंतरवालीत कोणी बोलावले नव्हते असे म्हणता, मग वर्षभर कशासाठी मराठ्यांची दिशाभूल केली? विखे पाटलांनी वर्षभर मराठ्यांना फसवले असून त्याची राजकीय किंमतत्यांना मोजावीच लागेल. विखे हे मराठा समाजासाठी कलंक ठरले आहेत. विखे पाटील हे केवळ पैशाच्या जोरावर राजकारण करतात आणि स्वतःवरील अपयश झाकण्यासाठी पळवाट शोधत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

Back to top button