वाघोलीत चिमुकल्या बहीण – भावाला सर्पदंश
संतप्त गावकर्यांनी विषारी साप ठेचून मारला

अमरावती /8 सप्टेंबर– माहोली जहागीर ठाण्याअंतर्गत येणार्या वाघोली गावात गाढ झोपेत असलेल्या एकाच घरातील दोन सख्ख्या निष्पाप भावंडांना विषारी सापाने दंश केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी प्रकारानंतर संपूर्ण पंचक्रोशीत प्रचंड घबराट पसरली आहे. सापाने आधी बहिणीला आणि नंतर एकट्या भावाला चावा घेतला. गंभीर अवस्थेतील दोघांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून चिमुरड्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
वाघोली गावातील चौहान यांच्या घरात सोमवारी पहाटे सर्व कुटुंबीय शांत झोपले होते. त्यावेळी घरात शिरलेल्या एका विषारी सापाने सहा वर्षांची चिमुकली परी चौहान हिच्या उजव्या हाताच्या बोटावर आणि कानावर जोरदार चावा घेतला. वेदनेने परी जागी होऊन रडू लागताच कुटुंबीयांनी तत्काळ अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात धाव घेतली. घरातील मंडळी परीला वाचवण्यासाठी दवाखान्याकडे पळाल्याने नऊ वर्षांचा मोठा भाऊ पवन चौहान हा घरात एकटाच झोपून राहिला होता. दरम्यान काही वेळातच त्याच सापाने घरात एकट्या झोपलेल्या पवनच्या उजव्या हातावरही विषारी दंश केला. शेजार्यांना ही बाब समजताच त्यांनी कसलाही विचार न करता पवनला घेऊन थेट इर्विन रुग्णालय गाठले. एकाच घरातील दोन चिमुकल्यांना सापाने दंश केल्याची बातमी वार्यासारखी पसरताच गावकर्यांनी संतप्त होऊन शोधमोहीम राबवली आणि त्या विषारी सापाला जागेवरच शोधून ठेचून मारले.
या भयानक घटनेमुळे वाघोलीतील नागरिकांनी इर्विन रुग्णालयात मोठी गर्दी केली. परीला सापाने दोनदा चावा घेतल्यामुळे तिच्या शरीरात विषाचा प्रादुर्भाव खूप जास्त पसरला आहे. दोन्ही लहान मुले सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून अख्ख्या गावाची नजर आता त्यांच्या प्रकृतीकडे लागली आहे.





