शकुंतला सुरु करण्यासाठी अचलपूर रेल्वे स्थानकावर आंदोलन
देशभक्तीच्या सुरांत लहरला तिरंगा

अचलपूर /16 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अचलपूर रेल्वे स्थानकावर देशभक्तीचा जोश आणि ‘शकुंतला सुरू झालीच पाहिजे’ या मागणीचा निर्धार एकाच वेळी अनुभवायला मिळाला. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या वतीने सलग आठव्या वर्षी सुरू असलेल्या अहिंसक जनआंदोलनाच्या 41व्या टप्प्यात शेकडो नागरिक, अधिकारी, गायक, सामाजिक कार्यकर्ते आणि सत्याग्रही एकत्र आले. देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला आणि ‘शकुंतला सुरू झालीच पाहिजे’च्या घोषणांनी उजाड रेल्वे स्थानक अक्षरशः दणाणून गेले.
सकाळी 9.10 वाजता ‘वंदे मातरम’च्या सामूहिक गायनातून राष्ट्राला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बरोबर 9.15 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष आरएफओ सुशांत काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शकुंतला रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या आंदोलनाला यंदा आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आर्थिक पाठबळावर नव्हे, तर नागरिकांच्या वर्गणीतून आणि स्वयंप्रेरणेने हे जनआंदोलन सुरू असल्याचा दावा समितीने केला. विविध माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाची दखल महाराष्ट्रासह देशभरातील नागरिक घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्थानकावरील मूलभूत सुविधांच्या अभावावरही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. रेल्वेच्या आरक्षण खिडकीतून दरमहा लाखो रुपयांचा महसूल मिळत असल्याचा दावा करताना स्थानकाच्या स्वच्छतेपासून ते स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय ध्वजापर्यंतच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. ‘महसूल घेता, मग सुविधा कधी देणार?’ असा सवाल उपस्थित करत रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात विविध सामाजिक संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माहेर फाऊंडेशनच्या शारदा उइके, विजया फाटकर, सुनीता वैद्य, माया धवणे, रंजना कडू, अॅड. मालती लवटे, किरण वडुरकर व शुभांगी देवळे; जमात-ए-इस्लामी हिंदच्या मो. नाझीम, सायरा बानो, मेहेर बानो, फिरदौस, जिकरा अहमद व नाझिया खान; क्रांतीज्योती संघटनेचे वसंत धोबे, रामदास मसने, नारायण धांडे व साहेबराव दामोदरे; रोटरी क्लबचे डॉ. दीपक गुलहाने, कमल केजरीवाल, राजकुमार बरडीया, धनंजय नाकिल व महेंद्र राठी तसेच संविधान चौक मित्रपरिवाराचे किरण गवई, राहुल खंडारे, आदित्य सदाशिव, संतोष खंडारे, शेख साबीर, डॅनियल नेतनराव, गोलू पेंटर व श्याम ठोसर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.




