राहुल गांधी साधणार ’जेन झी’शी थेट संवाद
नाशिकमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात देणार मार्गदर्शन

नाशिक/16 ऑगस्ट: चालू महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील शिबिर होणार असून, त्यात पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने राहुल यांनी नाशिकच्या ’जेन झी’शी संवाद साधावा, या दृष्टीने आयोजकांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने दिली आहे.
पक्षाच्या वतीने तसा प्रस्ताव पाठवल्याचे वृत आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी सृजन संघटन ही मोहीम राबवण्यात येणार असून, त्यासाठी खास जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र व गोव्यातील जिल्हाध्यक्षांची कार्यशाळा नाशिकमध्ये 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. या शिबिरात राष्ट्रीय आणि प्रदेश काँग्रेसचे विविध नेते कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार असून, संघटना वाढीसाठी कशा पद्धतीने नियोजन करावे याच्या टिप्स देण्यात येणार आहे. शिबिराच्या अखेरच्या दिवशी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधीनाशिकमध्ये येणार असून तेदेखील मार्गदर्शन करणार आहेत.
सध्या विविध विषयांवर सरकारला जाब विचारणार्या खासदार राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ’जेन झी’ वर्गातही मिसळून त्यांच्या भावना जाणून घेतात. त्यांनी जंतर मंतर उपोषणाला पाठिंबा देतानाच ’जेन झी’ वर्गाशी संवाद साधला आहे.आंदोलनानंतर भाजपसह सर्वच पक्षांमध्ये ’जेन झी’ची नवीन भाषा, भावना, भूमिका जाणून घेतल्या जात आहेत. त्यामुळे नाशिक दौर्यात राहुल गांधी यांनी ’जेन झी’शी संवाद साधावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्ताव प्रदेश कांग्रेसने अ. भा. काँग्रेस कमिटीला सादर केला आहे. गंगापूर धरणाजवळील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये हे शिबीर होणार असून त्या दृष्टीने जिल्हा पातळीवर कार्यवाही सुरू आहे.




