पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरातून निर्माण होतील नवीन रोजगार
आयआयएमसी: आठ दिवशीय कार्यशाळेत उमटला सूर

अमरावती /9 ऑक्टोबर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात झपाट्याने होत असून त्यात रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होत आहेत. पत्रकारितेत ही कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अमुलाग्र बदल होत असून या तंत्राचा प्रभावी वापर मुद्रित, इलेक्ट्रोनिक आणि डिजिटल माध्यमांचे विश्व बदलवीत रोजगाराचे नवे दालन उघडत असल्याचा सूर आयआयएमसीत आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावरील आठ दिवसीय कार्यशाळेत निघाला.
भारतीय जन संचार संस्थान (आयआयएमसी) मध्ये आयोजित आठ दिवसीय कार्यशाळेचा समारोप गुरुवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2026 रोजी झाला. यात विद्यार्थांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा बातमी लेखन, संपादन आणि तथ्य पडताळणीसाठी विविधांगी उपयोग, त्यासाठी वापरण्यात येणार्या वेगवेगळ्या साधनांची प्रात्यक्षिकसह माहिती मिळाली. यात अमरावतीच्या नेक्स्टजेन एआय अकॅडमीचे संचालक सुरेश पवार, यश विरुळकर, ऋतुराज सोलंके आणि मंगेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आधुनिक पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी, अचूक आणि नैतिक वापर यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. समारोप सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पाचे सादरीकरण केले. याप्रसंगी मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘शब्द प्रवाह’ या प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले. क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेत डॉ. विनोद निताळे, जयंत सोनोने, रोहन तायडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजेश झोलेकर, नूरुज्जमा शेख, भूषण मोहोकार, अनंत नांदुरकर, नंदा तुप्पट, राहुल पाटमासे आदींनी योगदान दिले.





