जंगलाचे नैसर्गिक ऋतुचक्र बिघडल्याने धोक्याचा इशारा
एल निनोचा मेळघाटच्या सागवान झाडांना फटका

फेब्रुवारीतील पानगळ नोव्हेंबरमध्येच झाली सुरू
कमी पावसामुळे जंगलातील ओलावा घटला
अमरावती /25 नोव्हेंबर – पावसाची कमतरता आणि एल निनोच्या तडाख्यामुळे मेळघाटच्या जंगलातील जमिनीचा ओलावा पार आटला आहे. याचा थेट फटका सागवानाच्या झाडांना बसला असून नेहमी फेब्र ुवारी किंवा मार्चमध्ये होणारी सागवानाची पानगळ यंदा 2 ते 3 महिने आधीच म्हणजे नोव्हेंबरमध्येच सुरू झाली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे वृक्ष बोडके होऊ लागल्याने जंगलाचे नैसर्गिक ऋतुचक्र बिघडल्याचा धोक्याचा इशारा वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सचिन तिप्पट आणि मानद वन्यजीव रक्षक राकेश महल्ले यांनी दिला आहे. सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोठा भाग सागवानाच्या झाडांनी व्यापलेला आहे. नेहमीच्या निसर्ग नियमानुसार जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येथील झाडांची पाने गळतात. त्यानंतर काही दिवस जंगलात फक्त उघडी झाडेच उभी दिसतात. मात्र यंदा हिवाळ्याची चाहूल लागताच नोव्हेंबरच्या अखेरीसच सागवानाची पाने गळून पडायला सुरुवात झाली आहे. जंगलातील पायवाटांवर वाळलेल्या पानांचा जाड थर साचला असून पावलांखाली येणार्या पानांचा करकर आवाज नेहमीपेक्षा कित्येक महिने आधीच घुमू लागला आहे.ङ्गयंदा विदर्भासह अमरावती जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने जंगलातील जमिनीतला ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पावसाळा संपल्यानंतर हवेत राहणारा गारवा आणि ओलावा यंदा टिकला नाही. उलट उन्हाचा चटका आणि जमिनीतील पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. जागतिक हवामानातील एल निनोच्या बदलामुळे समुद्रावरून आपल्याकडे येणारे पावसाळी वारे विरुद्ध दिशेने गेल्याने पावसावर हा परिणाम झाला आहे. त्यामुळे झाडांना जमिनीतून मुबलक पाणी मिळणे कठीण झाले असून पाण्याची बचत करण्यासाठी झाडांनी आपली पानगळ लवकर सुरू केली आहे.ङ्गपानगळीनंतर जंगल कायमचे उजाड होत नाही तर वसंत ऋतूत झाडांना पुन्हा नवीन कोवळी पालवी फुटते आणि काही झाडे फुलांनी बहरून जातात. पण यंदा ही पानगळ वेळेआधीच झाल्याने झाडांची वाढ आणि त्यांना येणारी फळे यावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.





