शहरात ड्रग्ज आलेच कसे?

पालकमंत्र्यांचा पोलीसांना सवाल

‘घरभेदी’ पोलीस अधिकार्‍यांचीही चौकशी करु

अमरावती / 5 जानेवारी : जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचे धिंडवडे उडवणार्‍या ड्रग्जचा महाभयंकर विळखा उघडकीस आला . नागपूरच्या गुप्तचर यंत्रणेने नवसारी परिसरात फिल्मी स्टाईलने धाड टाकून तब्बल 10 कोटींचे 5 किलो ’एमडी’ ड्रग्ज जप्त केले. स्थानिक पोलिसांना पूर्णपणे अंधारात ठेवून केलेली ही धडक कारवाई जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढणारी ठरली असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खाकी वर्दीतील ’घरभेद्यांचा’ आणि तस्करीच्या सूत्रधारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती शहर सध्या अंमली पदार्थांच्या दलदलीत रुतत चालले असून, येथील तरुण पिढी या जीवघेण्या नशेकडे ओढली जात आहे. गांजा आणि इतर अंमली पदार्थांनंतर आता अत्यंत महागड्या ’एमडी’ ड्रग्जची तस्करी शहरात उघडपणे सुरू असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) मिळालेल्या एका पक्क्या बातमीनुसार, नवसारी भागातील वस्तू व सेवा कर भवनासमोर एका पांढर्‍या रंगाच्या मोटारीतून या ड्रग्जची देवाणघेवाण होणार होती. डीआरआयच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि 4 आरोपींना बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे, शहरात इतकी मोठी तस्करी सुरू असताना स्थानिक पोलीस झोपेत होते की त्यांचे तस्करांशी साटेलोटे होते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शहर ड्रग्जमुक्त करणे ही माझी जबाबदारी आहे. या प्रकरणात पोलीस विभागातील कोणत्या अधिकार्‍यांचे हात गुंतले आहेत का, याचीही कसून चौकशी केली जाईल. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेला सुगावा लागण्यापूर्वीच अहमदाबाद पोलिसांनी या मोहिमेत मोठी भूमिका बजावत आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अमरावतीतील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले असून, अटकेतील आरोपींच्या चौकशीतून अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह-शहराच्या मुख्य भागात 10 कोटींचे ड्रग्ज पोहोचतात आणि स्थानिक पोलिसांना त्याचा पत्ताही लागत नाही, ही बाब प्रशासनासाठी नामुष्कीची ठरली आहे. केंद्रीय यंत्रणांनी केलेला हा ’सर्जिकल स्ट्राईक’ अमरावती पोलिसांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवणारा असून, आता खर्‍या सूत्रधारांना पकडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला बेड्या ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button