महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय
हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, दादांच्या 3 निर्णयांवर शिक्कामोर्तब

मुंबई/10 फेब्रुवारी– राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, मानवत येथील सूतगिरणीस अर्थसहाय्य, राज्यात अपर जिल्हाधिकारी पदांच्या निर्मितीस मान्यता अशा एकूण 19 महत्वाच्या निर्णयांची मंजुरी मंत्रिमंडळाने दिली. विशेष म्हणजे दिवगंत नेते अजित पवार यांनी पाठपुरावा केलेल्या तीन निर्णयांनाही आज मान्यता मिळाली.
जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नाबार्डकडून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्यात आले. यातून 57 अपूर्ण आणि 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा होणार असून राज्यातील 8 लाख हेक्टर शेतीस सिंचन सुविधा उपलब्ध होईल. कोल्हापूर जिल्ह्यात मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथील 12 हेक्टर 7आर शासकीय जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाईल. या निर्णयामुळे कोल्हापूरमधील क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे.पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापन करून प्रकल्पासाठी भुसंपादन व इतर अनुषांगिक बाबींमध्ये सहा हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांचा सहभाग असून त्यांच्याकडे कर्ज फेडीची जबाबदारी राहणार आहे.




