नवनीत राणा खूप लोकप्रिय आहेत, त्या आम्हाला ‘चिल्लर’ समजतात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका

* शिवसेना आ.संजय गायकवाड यांच्यावरही साधला निशाणा

अमरावती/23एप्रिल: महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथील काँग्रेस भवनात माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा आम्हाला ’चिल्लर’ समजतात, कारण त्या पंतप्रधान मोदींना ’थोक’ (मोठे) समजतात. त्या किती महान आहेत हे सर्वांना ठाऊक आहेच, कारण त्या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्याकडे चंदेरी दुनियेचे आकर्षण आहे, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आम्ही चिल्लरच ठरू.
’विषवल्ली’ शब्दाचा वापर करत राणांवर हल्लाबोल
नवनीत राणा यांनी केलेल्या काही विधानांचा समाचार घेताना वडेट्टीवार यांनी त्यांना ’विषवल्ली’ (विषाची वेली) असे संबोधले. ते म्हणाले की, नवनीत राणा या समाजात जातीचे विष पसरवण्यासाठीच पोसलेल्या विषवल्ली आहेत.
उल्लेखनीय आहे की, या वादाची सुरुवात नवनीत राणा यांच्या विधानामुळे झाली होती. राणा यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, काँग्रेसने हिरव्या विषारी सापांना जपले आहे. त्याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, हिरवा साप विषारी नसतो. खरं तर जे गोरे असतात, तेच अधिक विषारी असू शकतात; याचा त्यांनी थोडा अभ्यास करावा म्हणजे त्यांना उत्तर मिळेल.
परतवाडा प्रकरणावर भाष्य-परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडल प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार यांनी महिलांना धाडस दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अशा प्रकरणांत महिलांनी समोर येऊन तक्रार द्यायला हवी. पीडित महिला कोणत्या जातीची किंवा धर्माची आहे आणि आरोपी कोणत्या धर्माचा आहे, हे महत्त्वाचे नाही. जे लोक या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच लोक ’खरात’ प्रकरण किंवा मोझरी येथील विहिंप पदाधिकार्‍याच्या प्रकरणावर मूग गिळून गप्प का आहेत?

आ.संजय गायकवाड यांना इशारा

शिवसेना (शिंदे गट) आ.संजय गायकवाड यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत बोलताना वडेट्टीवार आक्रमक झाले. गायकवाड यांना आम्ही गंजे केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. लोकशाहीत संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोलले पाहिजे, अशा धमक्या देणे चुकीचे आहे. सरकारने याची दखल घेऊन संबंधित आमदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, प्रा. गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे लेखन केले आहे, ते पूर्णतः सत्य असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी नमूद केले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button