राजकीय पक्षांनी आचार संहितेचे काटेकोर पालन करावे
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन

राजकीय पक्षांच्या बैठकीत विभागीय आयुक्तांचे आवाहन
अमरावती /23 सप्टेंबर: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यादरम्यान, राजकीय पक्षांनी प्रचार सभा व रॅली घेताना आदर्श आचार संहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी आज येथे केले.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारत निवडणूक आयोगाने अमरावतीसह राज्यातील चार विभागांतील महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणार्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच विभागात आदर्श आचार संहिता लागू झाली असून त्यात विहित सूचना व नियमांचे राजकीय पक्षांनी काटेकोरपणे पालन करावे, विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा व रॅली घेण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयात परवानगी मिळेल तसेच एकच प्रचार सभा असेल तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी देण्यात येईल,या कालावधीत वाहन वापरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या नियमानुसार कार्यवाही व्हावी ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या निवडणूक कालावधी दरम्यान विभागातील 5 जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. विभागातील 27 उपविभागीय अधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करतील तर 56 तहसीलदार हे पदानिर्देशित अधिकारी म्हणून जबाबदारी पाहतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या 29 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रचारसभा आयोजनासाठी शाळा व महाविद्यालय परिसर टाळावा, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेवून सभा व रॅली आयोजन व्हावे, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रम तसेच आचार संहिता काळात ‘काय करावे व काय करू नये!’ आदींबाबत त्यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. सामान्य प्रशासन अपर आयुक्त संजय जाधव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शिवाजी शिंदे यावेळी उपस्थित होते.





