देशभरातील सरकारी बँका रविवारी सुरु राहणार
संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली/23 सप्टेंबर : सरकारी बँक कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर या दरम्यान तीन दिवसीय संप पुकारला आहे. यामुळे प्रत्यक्षात जाऊन करायची कामे येत्या तीन दिवसांत करण्याचा ग्राहकांना सल्ला दिला जात आहे. या संपाच्या काळात डिजिटल आणि एटीएम सुविधा सुरू असणार आहे. पण यावरून आता भारतीय रिझर्व बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचार्यांच्या तीन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमी आरबीआयने रविवारी (27 सप्टेंबर) सरकारी बँका सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार या दिवसांत देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्याआधी शनिवारी 26 सप्टेंबर आणि रविवारी 27 सप्टेंबर रोजी सुट्टी होती. अशामध्ये बँका रविवारीही बंद राहिल्यास ग्राहकांना अधिक काळ बँकिंग सेवांपासून वंचित राहावे लागले असते. पण, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका रविवारी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. त्यामुळे सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. यामुळे आता ग्राहकांना रोख रक्कम काढणे, जमा करणे किंवा इतर व्यवहार यांसारखी अत्यावश्यक कामे 27 सप्टेंबर रोजी देखील पूर्वीप्रमाणे करता येतील.





