एसआरपी कॅम्प परिसरात आगीचे तांडव
दोन बंब आणि जवानांच्या प्रयत्नांनी अनर्थ टळला

मुख्य कार्यालयामागील टेकडीवर आगीचा थरार
अमरावती / 20 फेब्रुवारी : शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊच्या मुख्य कार्यालयामागील टेकडीवर आज अचानक भीषण आग लागली. वाळलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत या आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील महत्त्वाच्या मालमत्तेचे संरक्षण झाले आहे.
अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल कॅम्प परिसर आज दुपारच्या सुमारास आगीच्या विळख्यात सापडला होता. मुख्य कार्यालयाच्या अगदी मागील बाजूस असलेल्या टेकडीवर ही आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या मोहिमेत राज्य राखीव दलाचे अधिकारी आणि जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण बचाव कार्याचे नेतृत्व अधिकारी नेवारे साहेब यांनी केले. त्यांच्यासोबत जे. ढोरे मेजर, सशस्त्र पोलीस निरीक्षक शिंगणे मेजर आणि अली पठाण मेजर हे प्रत्यक्ष रणांगणावर उतरले होते. कडक ऊन आणि आगीची धग अशा परिस्थितीतही या सर्व अधिकार्यांनी आणि जवानांनी अहोरात्र मेहनत घेत आगीचा वेढा तोडला. टेकडीवरील वाळलेल्या पालापाचोळ्यामुळे आग वेगाने पसरत होती, परंतु जवानांनी पाण्याचा मारा करून ती शमवण्यात यश मिळवले. या धडाकेबाज कामगिरीमुळे कॅम्पमधील मुख्य कार्यालयाला पोहचणारा धोका टळला आहे.
शौर्याची पराकाष्ठा आणि सतर्कता-राज्य राखीव दलाच्या जवानांनी दाखवलेली सतर्कता खरोखरच कौतुकास्पद आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार्या टेकडीला वाचवण्यासाठी अधिकारी नेवारे साहेब, ढोरे मेजर, शिंगणे मेजर आणि अली पठाण यांनी नियोजित पद्धतीने पावले उचलली. दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवत कॅम्प सुरक्षित केला.




