विषारी पाणी प्यायल्याने 51 शेळ्यांचा मृत्यू

बचत गटातील महिलांवर कोसळले दुःखाचे डोंगर

* उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने परिसरात मोठी हळहळ
* दोषींवर कठोर कारवाई करून भरपाई देण्याची मागणी

अंजनगाव सुर्जी/4 मार्च : येथील पांढरी मासमापूर भागातील महिलांच्या आयुष्यात बुधवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. उदरनिर्वाहासाठी पोटच्या पोरासारख्या सांभाळलेल्या 51 शेळ्यांचा तळ्यातील विषारी पाणी प्यायल्याने काही क्षणांतच तडफडून मृत्यू झाला. मासुम महिला बचत गटाच्या सदस्या दररोजप्रमाणे आपली जनावरे चारण्यासाठी शिंगमोडी नदीच्या काठावर गेल्या होत्या. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तहानलेल्या शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी शेतकरी श्रीकांत रुचके यांची परवानगी घेऊन शेतातील तळ्यात नेण्यात आले. मात्र ते पाणी शेळ्यांच्या जीवावर उठले. पाणी पिताच एकामागून एक शेळ्या जमिनीवर कोसळू लागल्या. काही कळायच्या आतच शेळ्यांनी डोळ्यांदेखत प्राण सोडले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे शमशाद बी मोहम्मद रियाज, शहनाज बी वाईद खा, जयबून बी सालीमुद्दीन, हुस्ना बी शेख हमीद, शमाबी इस्राईल खा, शबाना बी सलमान खा, शकीला बी सय्यद रियाजुद्दीन आणि सलामा बी शेख इरफान या महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत. या कष्टाळू महिलांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 6 लाख रुपयांचे कर्ज घेऊन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. हाताला काम आणि घराला आधार मिळेल या आशेने सुरू केलेला हा व्यवसाय एका क्षणात मातीत मिसळला. शेळ्या मरताना पाहून महिलांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. ठाणेदार सुरज बोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पीडित महिलांनी संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल करण्याची आणि तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

बळीराजाच्या शेतातच मृत्यूचा सापळा

बचत गटातील महिलांनी मोठ्या जिद्दीने हा व्यवसाय उभा केला होता. बँकेचा हप्ता भरण्याची चिंता असतानाच ही अस्मानी संकट कोसळले. शेतमालकाने तळ्यातील पाण्याबाबत सावध केले असते तर ही वेळ आली नसती अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आता या गरिबांना न्याय कोण देणार आणि त्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कसे उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button