मनपाच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करा

आचारसंहिता भंग झाल्याचा खा.बळवंत वानखडे यांचा आरोप

राज्य निवडणुक आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना लेखी तक्रारपत्र

अमरावती/11 जून– अमरावती जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाला असून 18 जून रोजी या निवडणुकीचे मतदान होणार आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंंगाने अमरावती शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती यांच्या आदेशाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. परंतु महानगर पालिका आयुक्त तसेच महानगर पालीकेचे अधि कारी यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार रोजी जन्म मृत्यूच्या दाखल्या संदर्भात एक बैठक आयोजित करून आचारसंहिता भंग केले असल्याचे निदशनास आले आहे. याविषयी खासदार बळवंत वानखडे यांनी थेट राज्य निवडणूक आयुक्तांना लेखी पत्राद्वारे माजी खासदार किरीट सोमय्या, यांच्यासह मनपाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. अमरावती मनपा मार्फत जन्म मृत्यू दाखल्यांचा घोळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. याबाबत किरीट सोमैय्या हे वारंवार अमरावती येथे येऊन याबाबत आक्षेप दाखल करतात. तसेच कोणत्याही संविधानिक पदावर नसताना शासकीय अधिकारी कर्मचारी समवेत बैठकी आयोजीत करतात. श्री. किरीट सोमय्या यांच्या दिनांक 08/05/2026 च्या आयुक्त मनपा यांना दिलेल्या पत्रांवये जन्म सुधारणा जन्म प्रमानपत्र घोटाळा बाबत कळविले होते तसेच सदर पत्रात दिनांक 11 जून रोजी या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी मनपा अमरावती येथे येणार असल्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने किरीट सोमैया, मनपा आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक जन्म मृत्यू नोंदणी विभाग , अमरावती महापौर , उपमहापौर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आदि अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक काळात आचारसंहिता असल्याने शासकीय बैठक , भूमिपूजन , शासकीय कार्यक्रम घेण्यास बंदी असल्यानंतर देखील या प्रकारची बैठक आयुक्त मनपा या जबाबदार अधिकार्यामार्फत मनपाच्या सभागृहात घेणे ही नियमबाह्य बाब आहे. या बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी तसेच किरीट सोमैया यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी राज्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली.

संबंधित बातम्या

Back to top button