काँग्रेसची विचारधारा आता गावगाड्यात पोहचवा

खा.बळवंत वानखडे यांचे आवाहन

* अमरावतीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

* आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना सज्ज

अमरावती / 30 मार्च – येणार्‍या जिल्हा परिषद आणि विविध राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच काँग्रेसने आपली कंबर कसली असून, आता संघटनेची ताकद थेट गावखेड्यांपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक मालटेकडी येथील काँग्रेस भवनात आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत खा.बळवंत वानखडे यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. आगामी आव्हाने पेलण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सक्रिय होऊन पक्षाची विचारधारा घराघरांत पोहचवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या विशेष सोहळ्यात अलीकडेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा जंगी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खा. वानखडे पुढे म्हणाले की, संघटनेची बांधणी जेवढी मजबूत असेल, तेवढाच मोठा विजय आपल्याला आगामी काळात मिळवता येईल. त्यासाठी मतभेदांना तिलांजली देऊन एकजुटीने मैदानात उतरावे लागेल. यावेळी व्यासपीठावर माजी आ. वीरेंद्र जगताप, माजी आ.राजकुमार पटेल, सुधाकर भारसाकळे, हरिभाऊ मोहोड, कांचनमाला गावंडे, अमरावती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल येवले, अनिकेत डेंगळे, रामेश्वर अभ्यंकर, मुकद्दर खान पठाण, चिखलदरा नगराध्यक्ष अब्दुल हैदर आणि अतशाह यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणनितीवरही खलबते झाली. कार्यकर्त्यांनी केवळ शहरापुरते मर्यादित न राहता शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील सामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असा सूर उमटला. यावेळी प्रकाश कालबांडे, एहतेशाम नबील, नामदेव तन्पुरे, जाहीद बेग, अस्लम बंजारा, सुनील गावंडे, राजेंद्र नागपुरे, शब्बीर भाई, मुरलीधर नाईक, साहेबराव भदे, किस्मतभाई, श्रीकांत झोडपे, अनिल देशमुख, किशोर देशमुख, मतीन भाई, जलील भाई, कदीर पैलवान, भूषण कोकाटे, मयूर देशमुख, शोएब खान, प्रमोद दालू, राहुल गवई, राहुल गाठो, सच्चिदानंद बेलसरे, आतिश शिरभाते, ईश्वर बुंदेले, दिलीप चव्हाण, उद्धव नलकांडे, रामेश्वर मालपाणी, बिट्टू मंगरोळे, राहुल बोडखे, श्याम बेलसरे, शंतनू सोळवे, अरविंद पाखाणे, भय्यासाहेब मेटकर, नंदकिशोर यादव, समाधान दहातोंडे, प्रदीप देशमुख, कलीमभाई आणि अमोल धवसे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच स्थानिक स्तरावर पक्ष अधिक बळकट करण्याची शपथ यावेळी घेतली.

विजयाचा गुलाल आणि विकासाचा संकल्प

नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या झेंड्याखाली निवडून आलेल्या शिलेदारांच्या सत्कारामुळे काँग्रेस भवनात चैतन्याचे वातावरण होते. हा विजय केवळ सुरुवात असून, ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचाच प्रभाव असावा, या ध्येयाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.

संबंधित बातम्या

Back to top button