ऐतिहासिक भीमा कोरेगाव मानवंदनेसाठी जय्यत तयारी

सायन्सकोर मैदानावर उद्यापासून तीन दिवस आयोजन

* लाखो भीमसैनिकांच्या उपस्थितीत होणार शानदार सोहळा

अमरावती /30 डिसेंबर : भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदनेसाठी अमरावती शहर सज्ज झाले असून, सायन्स कोर मैदानावर उद्यापासून तीन दिवस भव्य, ऐतिहासिक व विश्वविक्रमी मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सुमारे दोन लाख भीमसैनिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती आयोजक प्रमुख कैलास मोरे यांनी सायन्स कोर मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने यशस्वीपणे आयोजित होत असलेल्या या मानवंदना कार्यक्रमाचे यंदाचे आयोजन समता सैनिक दल व माजी सैनिक संघटना व मानवंदना आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सायन्सकोर मैदान येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून पंचशील ध्वज असलेले मोठे धम्मपीठ तसेच व्हीआयपी आसनव्यवस्था, सत्कारमूर्तींसाठी विशेष बसण्याची व्यवस्था तसेच मानवंदना साठी उपस्थित राहणार्‍या अनुयायांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था, बाहेरठिकाणा वरून येणार्‍या अनुयायांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था, याशिवाय धम्मसाहित्य, पुस्तके यांसाठी पन्नास स्टॉल,दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था,आकर्षक रोषणाई याठिकाणी करण्यात आली आहे. सन 1818 च्या ऐतिहासिक भीमा कोरेगाव शौर्यगाथेतील लढाईचे सरसेनापती सिध्दनाक महार यांचे 12 वे वंशज मिलिंद इनामदार (कळंबी) हे यावर्षी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय भिख्खू संघाच्या अमरावती जिल्हा शाखेतील भंतेगणांचीही उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, डॉ. कमलताई गवई, दिलीप एडतकर, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, एम.एस. बहेल (लंडन) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी संगीतमय कार्यक्रमातून भीमविचारांची ऊर्जा निर्माण होणार असून, शिंदेशाही गायक राहुल शिंदे (पुणे), होम मिनिस्टर फेम अभिजीत राजे तसेच जय भीम कडक रेपर विपिन तातड आपली कला सादर करणार आहेत.दुसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. याच दिवशी सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात व गायक अजय देहाडे यांचा भीम जागर कार्यक्रम होणार आहे.तर 3 जानेवारी रोजी सकाळी सावित्रीबाई फुले समारोह आयोजित करण्यात आला असून, 100 महिला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाट्य व भाषण सादर करणार आहेत. या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, गेल्या तीन महिन्यांपासून व्यापक तयारी सुरू आहे. सायन्स कोर मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून, उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांना पासेसचे वितरणही यावेळी करण्यात आले, असे आयोजक कैलास मोरे यांनी सांगितले. अमरावतीत होणारा हा मानवंदना कार्यक्रम सामाजिक एकोपा, इतिहासाचा अभिमान आणि भीमविचारांचा जागर ठरणार असल्याचे आयोजकांनी यावेळी नमूद केले. पत्रकार परिषदेला कैलाश मोरे यांचेसह धनंजय गुळदेकर, वसंतराव गवई, व्ही.एम. वानखडे, समाधान वानखडे, बी.आर. धाकडे, एस यू फुलझेले,कपिल धवने, कांचन आडोळे, सुशीला नागदिवे, लता गजभिये, माया बागडे,कुंदा डांगे, प्रतिभा वानखडे, सुनीता सिरसाट, सुवर्णा खांडेकर, अनिता जवंजाळ, बेबी मोहोड, सरला इंगळे, शफीभाई सौदागर. कृष्णराव वानखडे, राजेश अंभोरे , सुभाष कांबळे ,आशिष डोंगरे, प्रीतम चक्रे, सविता नाईक ,सविता इंगळे , रंजना अठोर ,कांचन आडोळे, कॅप्टन कमलेश्वर दाभाडे ,किशोर सरदार ,प्रभाकर वानखडे,मंगेश तायडे, नयन मोंढे ,अजय शृंगारे , अर्चना रक्षे ,सूर्यवंशी मामा, नकुल नाईक यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button