दुभाजकाला धडक लागून तिहेरी अपघात, 22 शेतमजूर थोडक्यात बचावले

विदर्भ मिल चौकातील थरारक घटना

परतवाडा/5 ऑक्टोबर – अमरावती परतवाडा मुख्य मार्गावरील विदर्भ मिल चौकात मजुरांची अवैध वाहतूक करणार्‍या भरधाव टेम्पोने वादग्रस्त दुभाजक वाचवण्याच्या नादात समोर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला जोरदार धडक देऊन भीषण पलटी घेतली. या तिहेरी अपघातात 22 शेतमजूर आणि दुचाकीवरील महिला दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावल्या असून परिसरात एकच खळबळ उडाली.
चिखलदरा तालुक्यातील माखला गावातून 22 महिला आणि पुरुष मजुरांना कोंबून घेऊन एमएच 27 बीएक्स 1636 क्रमांकाचा टेम्पो मजुरीसाठी जात होता. हा टेम्पो विदर्भ मिल चौकात येताच रस्त्याच्या मधोमध चुकीच्या पद्धतीने उभारलेला दुभाजक अचानक समोर आला. चालकाने त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र वेगावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो आधी रस्त्याकडेला उभ्या कारवर आदळला. त्यानंतर किराणाघेण्यासाठी आलेल्या नयना निंभोरकर यांच्या एमएच 27 डीपी 0147 क्रमांकाच्या दुचाकीला उडवून थेट रस्त्यावर आडवा झाला.
या भयानक धडकेत टेम्पोत बसलेले मजूर रस्त्यावर फेकले गेले. सर्व 22 मजुरांना मार लागून ते किरकोळ जखमी झाले, तर नयना निंभोरकर यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. याच भागात राहणार्‍या चौधरी परिवाराच्या चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले. भरचौकात मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत मजुरांना बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून एवढ्या मोठ्या दुर्घटनेत कोणाचाही जीव गेला नाही. स्थानिक प्रशासनाच्या चुकीच्या दुभाजकामुळे या चौकात आतापर्यंत 7 ते 8 वाहने अपघातग्रस्त झाली असून रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहनचालकांना वाट शोधणे कठीण होत आहे. ग्रामीण भागात मजुरांची अशा प्रकारे जीवघेणी अवैध वाहतूक सर्रास सुरू असूनही पोलीस यंत्रणा मात्र हात जोडून शांत बसल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

Back to top button