देशाचा चौफेर विकास वेगाने सुरूच

पंचवीस कोटी बांधव आले दारिद्रय रेषेच्या वर

मोदी सरकारच्या विकास कार्यक्रमावर चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

बारा वर्षांत अनेक महत्त्वाच्या लोककल्याणकारी योजना

अमरावती/12 जून- देशातील 25 कोटी नागरिकांनी दारिद्र्यरेषेबाहेर झेप घेतली असून, भ्रष्टाचार कमी झाला आहे. जनधन योजनेअंतर्गत 58 कोटी खाती उघडण्यात आली असून, त्यात 32 कोटी महिलांच्या खात्यांचा समावेश आहे. गेल्या 12 वर्षांत देशाचा कारभार पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. महायुती सरकारचे हे यश केवळ एक घोषणा नसून, जनआंदोलन झाले आहे, असा दावा अमरावती येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
हॉटेल ग्रँड महफिलच्या डायमंड हॉलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची आणि कामगिरीची माहिती आकडेवारीसह मांडली.ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी किसान सन्मान योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान सडक योजना आणि मुद्रा कर्ज यांसारख्या लोककल्याणकारी योजनांनी गोरगरिबांच्या जीवनाला मोठा आधार दिला आहे. गावागावांत रस्त्यांचे जाळे वेगाने विणले जात असून, पूर्वी दिवसाला सरासरी 20 किलोमीटर रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते, ते आता वाढवून दिवसाला 35 किलोमीटर रस्ते तयार केले जात आहेत. यामुळे गाव-खेड्यातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांचे जीवन सुकर झाले असून, गावातील लहान मुलांना शाळेत जाणे सोपे झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर या पक्क्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागात तातडीने वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य झाले. आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करताना देशभरात 23 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांची (एम्स) उभारणी करण्यात आली असून, आगामी 5 वर्षांत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ 109 लाख हेक्टर जमिनीला मिळणार आहे, ज्यामुळे शेतीचे उत्पादन 3 पटीने वाढणार आहे. गावागावांतील विकासाची गंगा पोहोचवत देशातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेट सेवेने जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. जागतिक पातळीवर देशाची पत वाढली असून, कोरोनाच्या संकटकाळात भारताने जगातील 99 देशांना औषधपुरवठा करून मदत केली आहे. रेल्वे प्रवासाचे आधुनिकीकरण करताना ’वंदे भारत एक्सप्रेस’सारख्या अत्याधुनिक गाड्या आता देशातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात धावत आहेत. देशातील 22 राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून, सर्वत्र प्रगतीची कामे सुरू आहेत. 65 वर्षांच्या जुन्या राजवटीच्या तुलनेत या 12 वर्षांतील कार्य अधिक प्रभावी ठरले आहे. या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे, खा. अनिल बोंडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रविणराज देशमुख, आ. प्रताप अडसड आणि विधान परिषदेचे उमेदवार प्रविण पोटे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रगतीचा नवा आलेख-देशात शेती उत्पादन 3 पटीने वाढवण्यासाठी 109 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणली आहे. गावात 24 तास वीज, पाणी आणि पक्के रस्ते पोहोचले आहेत. तसेच महिला सुरक्षा दलात महिलांचा सहभाग वाढला आहे. उर्वरित विकासकामे पुढील काळात पूर्ण करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button