लग्नसराई व सुट्ट्यांमुळे बसेस हाऊसफुल्ल

लालपरीची वारी अन् प्रवाशांची मोठी गर्दी

* खाजगी वाहतुकीलाही आता सुगीचे दिवस

अमरावती/26 एप्रिल- लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या गर्दीमुळे अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बस सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे लालपरी बसेस पूर्ण भरून धावत असून, महामंडळाने जादा गाड्या सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण आठ आगार असून 418 बसेस मार्गावर धावत आहेत. यामध्ये 19 शिवशाही विद्युत, 38 शिवशाही वातानुकूलित आणि 361 डिझेल बसेसचा समावेश आहे. अलीकडेच ताफ्यात 80 नवीन लालपरी बसेस समाविष्ट केल्या आहेत. इलेक्ट्रिक बसेसची मर्यादा 300 किलोमीटरपर्यंत असल्याने त्यांना दूरच्या प्रवासासाठी मर्यादित स्वरूपात वापरले जात आहे. एसटीत जागा मिळत नसल्याने अनेक प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत, मात्र याचा फायदा घेत काही ठिकाणी भाडेवाढ करण्यात आली आहे. अमरावती-चांदूर बाजार, अमरावती-अचलपूर आणि अमरावती-धारणी या मार्गांवर विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. अमरावती विभाग नियंत्रक सचिन डफळे यांच्या मते, प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज असून गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत.
जादा फेर्‍यांचा प्रवाशांना दिलासा-वाढत्या गर्दीमुळे एसटी महामंडळाने अमरावतीसह विविध मार्गांवर जादा फेर्‍या सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असून, गर्दीच्या ठिकाणी विशेष कर्मचारी नेमून प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महामंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे.

संबंधित बातम्या

Back to top button