अमरावतीत नवजात बाळाच्या विक्रीचा डाव उधळला
अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीचा गैरफायदा उघड

डॉक्टर दाम्पत्यांवर फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल
धमक्या देऊन नवजात बालकाचा बळजबरीने ताबा
अमरावती /18 ऑक्टोबर – उपचारासाठी दवाखान्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिचे नवजात बाळ परस्पर विकण्याचा धक्कादायक कट अमरावतीत समोर आला. याप्रकरणी डॉ. वैशाली भोजने आणि त्यांच्या पतीसह तीन जणांवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले. बाळाच्या ताब्यावरून वाद निर्माण करून धमक्या दिल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला असून सध्या बाळ आईजवळ सुरक्षित आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी दवाखान्यात घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षे 4 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे तिच्याच एका अल्पवयीन मित्रासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून मुलगी गर्भवती राहिली. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी उपचारासाठी तिला डॉ. वैशाली भोजने यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी तपासणी करून पोटात पाच महिन्यांचा गर्भ असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिच्यावर पुढील उपचार सुरू ठेवले.
दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी या अल्पवयीन मुलीची सुखरूप प्रसूती झाली आणि तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. मात्र बाळ जन्माला आल्यानंतर दवाखान्यातील वातावरण अचानक संशयास्पद बनले. डॉक्टरांनी बाळाच्या संगोपनावरून आणि त्याच्या ताब्यावरून पीडित मुलीच्या कुटुंबीयांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी मुलीने आणि तिच्या आईने जेव्हा स्वतःचे बाळ मागितले तेव्हा डॉ. वैशाली भोजने आणि त्यांच्या पतीने त्यांना थेट धमक्या दिल्या. स्वतःच्या बाळाला मातेपासून तोडून जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला.
डॉक्टर दाम्पत्य हे नवजात बाळ परस्पर विकण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने पीडित कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी डॉ. वैशाली भोजने आणि त्यांच्या पतीसह तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 64(2), 143(3), 143(4), 351(2), 3(5) तसेच पोस्को कायदा कलम 4, 6 व 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बाळ आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित असून या डॉक्टर दाम्पत्याने यापूर्वी असा प्रकार केला आहे का.? याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
नवजात बाळ आईजवळ सुरक्षित
पोलिसांनी तात्काळ पाऊल उचलल्याने नवजात बाळ सध्या त्याच्या आईजवळ सुरक्षित ठेवण्यात आले. बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जात असून बाल कल्याण समितीलाही या प्रकरणाची माहिती दिली. डॉक्टरांच्या या संशयास्पद वागणुकीमुळे संपूर्ण आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
डॉक्टर दाम्पत्याच्या चौकशीला वेग
या संपूर्ण कटकारस्थानामागे नेमके कोण गुंतले आहे ? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. डॉ. वैशाली भोजने आणि त्यांच्या पतीची कसून चौकशी चालू आहे. पैशांच्या आमिषातून बाळाची परस्पर विक्री करण्याचा डाव होता का यावर तपास अधिकारी लक्ष केंद्रित करत आहेत.





