सत्तापरिवर्तन हवे असेल, तर निवडणुकीच्या रिंगणात उतरा

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

मुंबई /18 ऑक्टोबर : भारतात सत्तापरिवर्तन केवळ निवडणुकांद्वारेच होऊ शकते, राज्यघटना नाकारून सत्तापरिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्तापरिवर्तनाच्या विधानावर टीका केली. तसेच, स्वतःच्या पक्षातील फूट रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.
दिल्लीत काही पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी होणार्‍यांविरुद्ध झालेल्या कथित हिंसाचारावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या सत्तापरिवर्तनाच्या मागणीचे समर्थन केले होते.
2022 मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, जेव्हा त्यांच्या पक्षाने हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडली, तेव्हाबाळासाहेबांच्या मूळ तत्त्वांचे पालन करू इच्छिणार्‍यांनी वेगळे होऊन खरी शिवसेना स्थापन केली. भारतातील निर्णय हे संसदेत आणि मतपेटीद्वारे घेतले जातात, रस्त्यावर नव्हे.जर तुम्हाला सत्तापरिवर्तन हवे असेल, तरतुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल, लोकांची मने जिंकावी लागतील आणि जनादेश मिळवावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या शेजारील देशांमधील अलीकडील राजकीय उलथापालथींचा उल्लेख करत फडणवीस यांनी इशारा दिला की, भारतातही अशीच अस्थिरता निर्माण करण्याचे स्वप्न पाहणार्‍या शक्ती यशस्वी होणार नाहीत.भारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर आधारलेला आहे. आपल्या घटनात्मक चौकटीची ताकद अशा सर्व मनसुब्यांना निष्फळ ठरवेल, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button