चांदूर रेल्वेतील रक्षणकर्ती जागृत जगदंबा माता
डोंगरीपुर्यात निजाम आणि भोसल्यांच्या काळातील ऐतिहासिक देवस्थान

साडेचारशे वर्षांच्या प्राचीन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा द्या
मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय निधीची गरज
चांदूर रेल्वे/18 ऑक्टोबर – चांदूर रेल्वे शहरातील जुन्या डोंगरीपुरा भागातील साडेचारशे वर्षांहून अधिक प्राचीन जगदंबा माता मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी शासनाने त्वरित ‘ब’ श्रेणीच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी एकमुखी मागणी आता भाविकांमधून पुढे येत आहे. शहराच्या स्थापनेपासून ग्रामस्थांचे रक्षण करणारी ही माता संकटात धावून येणारी देवी म्हणून ओळखली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी रांगा लावत असताना मंदिराचा जीर्णोद्धार आणि भक्तांच्या प्राथमिक सोयीसुविधांसाठी शासकीय निधीची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
चांदूर रेल्वे शहराच्या डोंगरीपुरा भागात वसलेले हे जागृत देवस्थान स्थानिक नागरिकांसाठी केवळ श्रद्धेचे ठिकाण नसून संपूर्ण शहराचा आधारवड मानले जाते. सन 1570 च्या काळात जेव्हा शहराची पायाभरणी झाली, तेव्हापासून या देवीची स्थापना करून गावकरी पूजाअर्चा करत आले आहेत. त्या काळात गावात रोगराई, संकटे किंवा अस्मानी संकटे आली की गावकरी मातेच्या चरणी लीन होत असत.
इतिहास असा सांगतो की, त्या काळात उत्तर प्रदेशातील बैसवाडा भागातून आलेल्या भैंसे आणि बैस कुटुंबीयांना येथे इनाम म्हणून जमीन मिळाली होती. त्या वेळी या भागात निजाम तसेच भोसल्यांचे राज्य होते. बैस कुटुंबीयांनी पाच एकर परिसरात या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून चालत आलेली ही अखंड पूजेची परंपरा आजतागायत भाविकांनी मनोभावे टिकवून ठेवली आहे.गावावर कॉलरा साथीचे मोठे संकट आले असता अनेकांचे प्राण धोक्यात आले होते. त्या कठीण काळात ग्रामस्थांनी मातेसमोर नवस बोलून गावाची रक्षा करण्याची याचना केली. मातेच्या कृपेने ते भयंकर संकट टळले आणि लोकांचा विश्वास अधिकच दृढ झाला. तेव्हापासून चांदूर रेल्वेची रक्षणकर्ती म्हणून या जगदंबेची कीर्ती सर्वदूर पसरली. दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे मोठे उत्सव साजरे होतात.
मात्र, भाविकांची संख्या वर्षागणिक वाढत असताना मंदिर परिसरात पिण्याचे पाणी, भक्तनिवास आणि दर्शन रांगेसारख्या पायाभूत सुविधांची मोठी कमतरता भासत आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष सचिन वर्मा यांच्या नेतृत्वात मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. हजारो भाविक तन-मन-धनाने या कामात हातभार लावत असले तरी मोठ्या कामांसाठी सरकारी मदतीची नितांत आवश्यकता आहे. सरकारने या पुरातन देवस्थानचे महत्त्व ओळखून तातडीने पावले उचलावीत.





