बस आणि कारच्या धडकेत पाच जणांचा मृत्य

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

बीड /18 ऑक्टोबर  : बीड जिल्ह्यातील पंढरपूर-खामगाव पालखी महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बस आणि कारच्या जोरदार धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिंदेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. माजलगाव येथून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एक कुटुंब कारमधून तुळजापूरच्या दिशेने प्रवास करत होते. शिंदेवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारची एका बसशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसच्या पुढील भागाचेही तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरकाही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.या अपघातातील मृतांची नावे ओमकार महादेव गिरी (वय 24), गजानन महादेव नामदास (वय 38), माऊली गजानन नामदास (वय 11), सोमनाथ बडे (वय 23) आणि अनिल आचार्य (वय 40) अशी आहेत. एकाच अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये सुमारे 50 ते 70 जणांचा मृत्यू झाला आहे. या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने काम करावे, तसेच संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

Back to top button