वीर विल्लम नगरात बिबट्याच्या दर्शनाने दहशत

रात्रीच्या अंधारात वाहनाजवळ आढळला बिबट्या

अमरावती/18 ऑक्टोबर : महानगरपालिका क्षेत्रातील बायपास रस्त्यावरील वीर विल्लम नगर (वडद) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भयानक बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाजवळ असलेल्या डॉ. रूपेश खडसे यांच्या घरासमोर आणि त्यांच्या ’डॉ. रूपेश खडसे मोटार ड्रायव्हिंग स्कूल’च्या गाडीजवळ आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एक बिबट्या थेट नजरेस पडला. हा बिबट्या गाडीकडे पाहत शांतपणे उभा होता. काही तरुणांनी प्रसंगावधान राखून या बिबट्याचे छायाचित्र आपल्या भ्रमणध्वनीत टिपले. हा प्रकार समोर येताच परिसरात भीतीचे ढग पसरले आहेत.
वीर विल्लम नगरात दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या हिंस्र प्राण्यापासून मोठा धोका संभवत असल्याने डॉ. रूपेश खडसे यांनी सर्व नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. वीर विल्लम नगर, मोठा बडनेरा, मेघे कॉलेज आणि चक्रधर पेट्रोल पंप बायपास परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांनी विनाकारण फिरू नये, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी उठत आहे. मानवी वस्तीत घुसलेल्या या बिबट्याला तात्काळ पिंजर्‍यात बंद करून सुरक्षितपणे घनदाट जंगलात सोडावे, जेणेकरून कोणत्याही मानवाची अथवा प्राण्याची हानी होणार नाही, अशी ठाम भूमिका लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉ. रूपेश खडसे यांनी मांडली आहे. वनविभागाने त्वरित या भागात गस्त वाढवून बिबट्याला पकडावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Back to top button