अयोध्येची जागतिक सांस्कृतिक राजधानीकडे वाटचाल

स्वामी गोविंद देव गिरीराज यांचे प्रतिपादन

संपादक अनिल अग्रवाल यांच्याशी स्वामीजींची खास बातचित

अमरावती / 11 फेब्रुवारी – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे केवळ एका नगरीचा कायापालट झाला नसून संपूर्ण भारताचे तेज उजळले आहे. अयोध्येला जगाची सांस्कृतिक राजधानी बनवण्याचा आमचा संकल्प असून, येणार्‍या काळात ही नगरी मानवी मूल्यांचा आणि आदर्श आचरणाचा जागतिक वारसा बनेल, असा ठाम विश्वास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केला.
‘आपली मातृभूमि’ चे संपादक अनिल अग्रवाल यांच्याशी तब्बल 40 मिनिटे चाललेल्या दिलखुलास चर्चेत त्यांनी राम मंदिराचा प्रभाव, तरुणाईचे बदललेले विचार आणि त्यांच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रवासावर सविस्तर प्रकाश टाकला.मुलाखती दरम्यान स्वामीजी म्हणाले की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. पूर्वी जिथे स्मशानशांतता असायची, तिथे आता चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आजची तरुण पिढी पाश्चिमात्य संस्कृतीकडे न वळता अयोध्या, काशी आणि प्रयागराज सारख्या तीर्थक्षेत्रांकडे आकर्षित होत आहे. गेल्या 24 महिन्यांत तरुणांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस साजरे करण्यासाठी ते धार्मिक स्थळांना पसंती देत आहेत. यातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळाली असून धार्मिक पर्यटनाने उत्तर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलला आहे. स्वामीजींनी त्यांच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा देताना सांगितले की, वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी गीता पठण सुरू केले आणि वडिलांच्या आजारपणामुळे 17 व्या वर्षी पहिली भागवत कथा सांगितली. गेल्या 60 वर्षांपासून ते निरंतर सनातन धर्माची सेवा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेपूर्वी केलेल्या 11 दिवसांच्या कडक उपवासाचा उल्लेख करताना स्वामीजी भावूक झाले. त्यांनी सांगितले की, उपवास सोडवताना त्यांच्या मनात मातृत्व भाव दाटून आला होता. तसेच, अमरावती ही ’छोटी आळंदी’ असून संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यामुळे या नगरीशी त्यांचे अतूट नाते असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button