अंजनगाव सुर्जी बाजार समितीत महास्फोट; 17 संचालक अपात्र

भाजपच्या सहकारातील सत्तेचा बुरुज ढासळला

जिल्हा उपनिबंधकांचा धडाकेबाज निर्णय

नियमभंग आणि मनमानी कारभाराला चपराक

सहकार क्षेत्रात उडाली मोठी खळबळ

अंजनगाव सुर्जी/24 एप्रिल– जिल्ह्यातील सहकार राजकारणात भाजपचा एकमेव गड मानल्या जाणार्‍या अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी दुपारी मोठा राजकीय भूकंप झाला. सत्तेच्या अधिकाराचा गैरवापर आणि कायद्याची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या 18 पैकी तब्बल 17 संचालकांना एकाच फटक्यात अपात्र ठरवले आहे. या स्फोटक निर्णयामुळे भाजपच्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अस्तित्वालाच सुरुंग लागला असून, तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशास कीय पातळीवर झालेल्या या ऐतिहासिक कारवाईमुळे आता बाजार समितीवर प्रशासक बसण्याचे संकेत असून, विरोधकांनी रचलेले राजकीय चक्रव्यूह यशस्वी ठरले आहे.जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 आणि निवडणूक नियम 2017 च्या विविध तरतुदींनुसार हा धाडसी निर्णय दिला. यामध्ये कलम 6(1), 11, 29, 31(1) आणि 57(2) सह नियम 32, 59, 100, 116 व 118 चे वारंवार उल्लंघन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ किरकोळ तक्रारी वरून नव्हे, तर गंभीर स्वरूपाचे नियमबाह्य खर्च आणि अर्थ संकल्पातील गोंधळ या पुराव्यांच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठिणगी शरद साबळे, विनायक वाघ आणि सुधीर अढाऊ यांनी टाकलेल्या तक्रारीमुळे पडली होती. त्यांनी मांडलेल्या पुराव्यांची सखोल चौकशी केल्यानंतर, जिल्हा उपनिबंधकांनी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार सर्व संचालकांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, सत्ताधारी संचालकांनी सादर केलेले स्पष्टीकरण आणि कागदपत्रे आरोपांच्या काट्यासमोर फिकी ठरली. यामुळे बाजार समितीचे विद्यमान सत्ताकेंद्र पूर्णपणे कोलमडले असून अनेक मातब्बर चेहरे राजकारणातून काही काळासाठी बाजूला फेकले गेले आहेत. या कारवाईत अपात्र ठरलेल्या संचालकांमध्ये जयंत साबळे (सभापती), सुरेश राऊत, विकास येवले, सागर परिणमी, वासुदेवराव घोगरे, अविनाश सदार, विजय कळमकर, शारदाताई ढोक, पूनमताई पोटे, सुरेश आडे, विशाल पंडित, अनंतराव रोकडे, अमर शिंगणे, प्रदीप इंगळे, चंद्रशेखर शेळके, शंकरराव चोरे, संजय काळमेघ आणि शेख जमील शेख रहेमान या नावांचा समावेश आहे. या सर्वांना पदावर राहण्यास अयोग्य ठरवल्याने आता अंजनगाव सुर्जीच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
या निर्णयावर माजी सभापती जयंत साबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय दबावाखाली आणि विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या विकासासाठी कोट्यवधींची कामे पूर्णत्वाकडे नेली असताना, जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले. या अन्यायाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालयात दाद मागणार असून वरिष्ठ न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, सध्या तरी भाजपच्या सहकारातील ’शुभारंभा’लाच सुरुंग लागल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button