अकोल्याचा पारा 44 तर अमरावतीत 43.8 तापमानाची नोंद

विदर्भातील दोन्ही जिल्ह्यांत सूर्याची मोठी आग

तापमानाचा पारा आता 45 अंशांच्या पार जाणार

पुढील आठ दिवस नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

अमरावती/15एप्रिल – विदर्भाच्या मातीत सध्या सूर्याचा मोठा प्रकोप पाहायला मिळत असून अकोला आणि अमरावती या दोन्ही शहरांनी उष्णतेचे जुने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अकोल्याचा पारा 44 अंशांवर पोहोचल्याने हे शहर देशातील पहिल्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. सोबतीलाच अमरावतीमध्येही 43.8 अंश तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. नागपूर हवामान केंद्राने आगामी आठ दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा दिला असून येत्या काळात विदर्भातील ही मुख्य शहरे 46 अंशांची दाहकता गाठण्याची दाट शक्यता आहे. या वाढत्या उष्म्यामुळे अकोला आणि अमरावतीमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत सूर्याची आग इतकी वाढली आहे की सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचे चटके अंगाला सोसवेनासे झाले आहेत. अमरावतीत सलग दुसर्‍या दिवशी 42.8 अंशांवरून पारा थेट 43.8 अंशांपर्यंत वर सरकला आहे. यामुळे दुपारी घराबाहेर पडणे जणू अग्नीकुंडातून चालण्यासारखे कठीण झाले आहे. अकोला तर सलग तिसर्‍या दिवशी 44 अंशांसह देशात अव्वल स्थानी राहिले असून कर्नाटक राज्यातील कलबुर्गी शहराचीही स्थिती अशीच आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत आता अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या विदर्भातील शहरांचा समावेश झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्ण लहरींचा प्रभाव वाढल्यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भाच्या इतर भागांतही उष्णतेचा कहर कायम असून उन्हाच्या झळांनी गाव-खेड्यातील जनता हैराण झाली आहे. मंगळवारी वर्ध्यात 43.5 अंश, यवतमाळमध्ये 42.6 अंश, गडचिरोलीत 42.6 अंश आणि वाशिममध्ये 42.4 अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान नोंदवण्यात आले. नागपूरमध्ये पारा 42.2 अंशांवर असला तरी तेथेही उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्याने आपले हे रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केल्याने मे महिन्यातील कडाका किती भयावह असेल या कल्पनेनेच सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरली आहे. प्रशासनाने कामाशिवाय कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे असे सांगितले असून वाढत्या उष्म्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे हाल आणि उष्माघातासारख्या समस्या देखील वाढू लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button