मासोद येथे आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
गिट्टी खदानीतील पाण्याच्या साठ्यांचा जीवघेणा धोका

शोध मोहीम रात्रभर वेगाने सुरूच राहिली
अमरावती/11 जून – दिवसभराचे काम आटोपून मित्रांसोबत मासोद खदानीतील पाण्याच्या साठ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुण मजुराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मासोद येथे घडली आहे. अब्दुल वाहीद अब्दुल वहाब असे या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पाण्यात उतरल्यानंतर अचानक पाय घसरून खोल भागात ओढल्या गेल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून गावकर्यांमध्ये कमालीची हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत रात्रभर युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली.
मासोद येथील गिट्टी खदानीमध्ये असणार्या मोठ्या जलसाठ्यात ही दुर्दैवी घटना घडली. अब्दुल वाहीद अब्दुल वहाब हा तरुण दररोजप्रमाणे आपले काम संपवून सायंकाळच्या सुमारास सहकार्यांसोबत आंघोळ करण्यासाठी खदानीच्या परिसरात गेला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व मित्र पाण्यात उतरले. आंघोळ करत असताना अचानक अब्दुल वाहीद याचा पाय घसरला आणि तोल गेल्यामुळे तो थेट खदानीच्या खोल डोहात ओढला गेला. त्याला पाण्यात बुडताना पाहून सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली आणि त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, खदानीतील पाण्याची खोली अतिशयजास्त असल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने मित्रांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि अब्दुल वाहीद पाहता पाहता डोळ्यादेखत पाण्यात गडप झाला. या थरारक घटनेची माहिती मिळताच गावातील जागरूक नागरिक अब्दुल हमीद आणि हाफिज ताहेर यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने खदानीकडे धाव घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आणि मदतकार्यासाठी यंत्रणेला पाचारण केले. माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने स्थानिक पोहणार्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत पाण्यात शोधमोहीम सुरू ठेवली होती. या अपघाताचे वृत्त वार्यासारखे पसरताच खदानीच्या परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यूचा सापळा: वेळीच व्हा सावध-मासोद येथील या भीषण दुर्घटनेने गिट्टी खदानीतील पाण्याच्या साठ्यांचा जीवघेणा धोका पुन्हा एकदा समोर आणला आहे. पाण्याचा आणि तळाचा अंदाज नसतानाही तरुण अशा धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी उतरतात आणि जीव गमावतात. तरुणांनी अतिउत्साहात अशा ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे आणि प्रशासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे




