24 तासात जिल्ह्यात 4 मृत्यू
पोलीस यंत्रणेकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

अमरावती/10 मे– अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, दत्तापूर आणि आसेगाव पूर्णा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या चोवीस तासात मृत्यूच्या चार हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये कुणी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली तर कुणाचा छतावरून पडल्याने किंवा हृदयविकाराने प्राण गेला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथे अनिल किसन लबडे या 55 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल हे लग्नासाठी गावी आले होते मात्र व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे अनिल बेठेकर या 8 वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह चुरणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलीस हवालदार सतीश जामोदकर या घटनेचा सखोल तपास करत आहेत. धामणगाव रेल्वे येथील 50 वर्षीय अनंत सुरेश कस्तुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 13 एप्रिल रोजी घराच्या छतावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या असदपूर येथील 33 वर्षीय सचिन अशोकराव नितनवरे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.




