कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही
सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

मान्यवरांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल
बारामती/6 एप्रिल: आदरणीय अजित दादांचे जाणे ही केवळ माझी किंवा माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर ती संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्राची हानी आहे. बारामतीकरांच्या विकासासाठी आणि दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आहे आणि अत्यंत धीरानं तुमच्यासाठी बाहेर पडले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांसह महायुतीचे अनेक दिग्गज नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. तुमची साथ हीच माझी शक्ती-सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, गेल्या 35-36 वर्षांत तुम्ही दादांना नेहमीच प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे. आज हा अर्ज भरताना मला जो धीर मिळाला आहे, तो केवळ तुम्हा बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा आणि तुमची साथ हीच माझी खरी शक्ती आहे.
बारामतीचा विकास सुरु राहील’-बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे. अजितदादांचा विचाराचा वारसा सांभाळात मी काम करीत राहील. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वार्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहील, असेही यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
बारामती म्हणजे दादांचा श्वास
आपल्या भाषणाची सुरुवात करताना सुनेत्रा पवार यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले. बारामतीत ही पोट निवडणूक होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. दादा आजही आपल्यात नाहीत हे मला मान्यच नाही. नियतीने हा कठीण काळ आपल्यावर आणला आहे, असे त्या म्हणाल्या. बारामतीशी असलेल्या दादांच्या नात्याबद्दल बोलताना, दादांसाठी बारामती म्हणजे आई सारखी होती. इथला प्रत्येक नागरिक हा त्यांच्यासाठी पांडुरंग होता. असेही त्या म्हणाल्या.




