यंदाच्या वर्षी राज्यात 90 टक्केच पाऊस पडणार
शेतकर्यांसह नागरिक चिंतेत, हवामान विभागाकडून अंदाज

मुंबई/29 मे- राज्यात सध्या वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वरूण राजाची कृपा कधी होणार? आणि राज्यात पावसाला सुरुवात कधी होणार? असे प्रश्न नागरिकांकडून आणि शेतकर्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच आता भारतीय हवामान खात्याकडून सर्वसामान्यांना आणि शेतकर्यांना धडकी भरवणारी माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने याआधी संपूर्ण देशात सरासरी 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता हवामान खात्याकडून संपर्ण देशात केवळ 90 टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही 60 टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे, त्यामुळे याचा मोठा फटका यंदाच्या वर्षापासून शेतीपासून अनेक उद्योगधंद्यांपर्यंत ते लोकांच्या सामान्य जीवनावर पडू शकतो. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी पावसावर परिणाम होणार असल्याचेही आता हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.




