दादांच्या आठवणीने सभागृहात अश्रुधारा

मुख्यमंत्री गहीवरले, राष्ट्रवादीचे आमदार अजूनही धक्क्यातच

मुंबई/23 फेब्रुवारी – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शोक प्रस्ताव मांडला. यावेळी अजितदादांच्या अनेक आठवणी जागवताना आणि त्यांच्या कामाची स्तुती करताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर, अजित पवारांना मुख्यमंत्री सुद्धा व्हायचे होते, त्यामुळे त्यांच्या या आठवणींना उजाळा देताना महाराष्ट्राला मिळणारा चांगला मुख्यमंत्री आपल्यात नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शोक प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान अजित पवारांना मिळाला. दादा अनेकदा म्हणायचे की, मी कधीतरी मुख्यमंत्री होईल. पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहिल. त्यामुळे, आज मी हे म्हणून शकतो की, अजितदादा पवार हे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो आज अजित पवारांच्या रूपाने आपल्यात नाही. कधीतरी नियतीने त्यांचे ते स्वप्नही पूर्ण केले असते. शेवटी राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे गणिते असतात. पण क्षमतेचा विचार केला असता मुख्यमंत्री पदाकरिता पूर्णपणे क्षमता असलेले नेतृत्व अजित पवारांचे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पोटात एक ओठात एक अशी त्यांची सवय नव्हती. कोणतीही सवय नसलेल्या पवार यांना काम करण्याची मात्र सवय होती. असे फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्येक विषयाचा अभ्यास करून अजित पवार येत असत. प्रत्येक प्रश्नाची त्यांच्याकडे टिपण असे. महाराष्ट्राने क्षमता असलेला मुख्यमंत्री गमवाला. राज्यात फक्त दोनच दादा होऊन गेले एक वसंतदादा पाटील आणि दुसरे अजितदादा पवार. हे दोन्ही नेते त्यांच्या कामकाजातून लक्षात राहिले. बारामती मतदार संघाचा अपरिचित नेता म्हणून परिचित होते. अजित पवार यांच्या सारखा एक प्रशासक, नेता, कुटुंबातील व्यक्ती आणि चांगला मित्र गमवला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या

Back to top button