भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर

एमआयएमच्या मीरा कांबळेंनी महायुतीला मत दिल्याने देशभरात खळबळ

55 मतांची मोट बांधण्यात भाजपाला यश, वंचित तटस्थ, उबाठा फुटली

अमरावती /6 फेब्रुवारी : महानगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या हायव्होल्टेज निवडणुकीत भाजप पुरस्कृत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी आणि युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांची उपमहापौरपदी 55 मते मिळवून दणदणीत निवड झाली. एमआयएमच्या एका नगरसेविकेने पक्षादेश झुगारून महायुतीला मतदान केल्याने राजकारणात मोठा भूकंप झाला असून, या विजयामुळे अमरावतीच्या विकासाचा रखडलेला गाडा आता वेगाने धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती महानगर पालिकेच्या या चुरशीच्या लढतीत महायुतीने एकजुटीचे दर्शन घडवले. महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर पदाचे उमेदवार सचिन भेंडे यांना भाजपची 25, युवा स्वाभिमानची 15, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 11, शिवसेना (शिंदे गट) 3 आणि एमआयएमच्या एका बंडखोर नगरसेविकेचे असे एकूण 55 मते मिळाली. याउलट काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार प्रा. संजय विरभाते आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार लुबना तन्वीर यांना केवळ 16 मतांवर समाधान मानावे लागले. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना स्वतःच्या पक्षाची 3 मते मिळाली. या निवडणुकीत बडनेरा जुनी वस्ती प्रभागातील एमआयएमच्या नगरसेविके मीरा कांबळे यांनी थेट महायुतीला पाठिंबा देऊन सर्वांना धक्का दिला. मुलाच्या सल्ल्यानुसार आणि स्वतंत्र विचाराने हे पाऊल उचलल्याचे सांगत त्यांनी उघडपणे मतदान केले, ज्यामुळे एमआयएमने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि एमआयएमचे 11 नगरसेवक या प्रक्रियेत तटस्थ राहिले. भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी या विजयाचे स्वागत करताना सांगितले की, आता घोषणांचा काळ संपून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. शहरात रखडलेली भुयारी गटार योजना पूर्ण करणे आणि दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दररोज सुरळीत करणे ही आमची प्राथमिकता असेल. कचरा व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभारावर भर देऊन अमरावतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.

मीरा कांबळेंचा दिला एमआयएमला दे धक्का!

एमआयएमच्या नगर सेविका मीरा कांबळे यांनी पक्षाचा आदेश डावलून महायुतीला साथ दिल्याने विरोधकांची रणनीती पूर्णपणे कोलमडली. पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असली तरी तांत्रिक मुद्द्यांमुळे त्यांचे पद कायम राहण्याची शक्यता आहे. या एका मताने अमरावतीच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक भक्कम केले असून विरोधकांचे मनसुबे उधळून लावले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button