दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत करणार
व्यथा मांडताना शेतकर्याला अश्रू अनावर

मराठवाड्यात मुख्यमंत्री दुष्काळी जिल्ह्याच्या दौर्यावर
दोन दिवसात जीआर काढणार
मुंबई /23 सप्टेंबर : मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय काढण्यात येईल आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी पिके घेण्याची शक्यता असल्यास त्यासाठीही मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. लातूर, धाराशिव आणि सोलापूरजिल्ह्यांच्या दुष्काळी पाहणी दौर्यात लातूरमध्ये शेतकर्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर असून 1972 नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मागील काळात 64 टक्के पाऊस झाला होता, तर यंदा 50 टक्के पाऊस झाला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून ती कायदेशीर तरतुदीनुसार केली जात आहे. मात्र, शेतकर्यांचे नुकसान सरसकट झाले असल्याने मदतही सरसकट करण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाची मदत लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
लातूर जिल्ह्यातील पाहणीदरम्यान शेतकर्यांनी पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पीक उगवले नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शेतकर्यांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ‘थोडा धीर ठेवा, लवकर मदत करू. या संकटात तुम्ही एकटे नाही,’ असा विश्वास त्यांनी दिला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असून रोजगारनिर्मितीची कामेही सुरू केली जातील. पुढील तीन-चार महिने आव्हानात्मक असतील. या काळात एकमेकांना मदत करून परिस्थितीतून मार्ग काढावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
शेतकर्यांसाठी कर्जमाफीचे काम सुरू असून ते पूर्ण होईपर्यंत सरकार थांबणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, तसेच दुष्काळाची मदतही लवकरात लवकर खात्यात जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शेतकर्यांचे 48 हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्यात आले असून ही थकबाकी पुन्हा वसूल केली जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.





