अजय, शाहरुख, टायगरला तुकाराम मुंढेंचा दणका

’विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस

मुंबई /16 ऑगस्ट : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) बॉलिवूड अभिनेत्यांना दणका दिला आहे. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ’विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे राज्यात प्रतिबंधित असलेल्या ’विमल पान मसाला’ची अप्रत्यक्ष जाहिरात (सरोगेट डव्हर्टायझिंग) केली जात असल्याचा आरोप एफडीएने त्यांच्यावर केला आहे.
राज्यात तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री आणि प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र एफडीएने कारवाई तीव्र केली असून आता हे तीन अभिनेतेही प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.या आठवड्यात बजावण्यात आलेल्या नोटिशीद्वारे अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना याजाहिरातीतील त्यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. एफडीएच्या मते, ही जाहिरात ’विमल पान मसाला’ ब्रँडशी संबंधित असून ’अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006’ (एफएसएस) अंतर्गत तंबाखूजन्य उत्पादनांची अप्रत्यक्ष जाहिरात ठरु शकते.
नोटिशीत म्हटले आहे की, संबंधित जाहिरातीची तपासणी केल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसून येते की, ही जाहिरात ’विमल’ ब्रँडचा प्रसार करते. हा ब्रँड प्रामुख्याने ’पान मसाला’शी संबंधित आहे. याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित आहे. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी एफएसएस कायदा, 2006 च्या कलम 30(2)(ए) अन्वये 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केल्याप्रमाणे, हा प्रतिबंध एका वर्षाच्या कालावधीसाठी लागू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button