अमरावती बोर्डात कॉपी प्रकरणी 50 कर्मचारी निलंबित

कॉपी प्रकरणातही अमरावती बोर्ड अव्वल

पुणे /20 मार्च : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागाने कॉपी बहाद्दरांच्या बाबतीत राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. परीक्षा ’नक्कलमुक्त’ करण्यासाठी प्रशासनाने कितीही कडक पावलं उचलली असली, तरी बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात सर्वाधिक 59, तर दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात सर्वाधिक 25 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, या गैरप्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या आणि कर्तव्यात कसूर करणार्‍या तब्बल 103 कर्मचार्‍यांवर निलंबनाची ऐतिहासिक कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेत यंदा प्रशासनाने कमालीची कडक भूमिका घेतली होती. बारावीसाठी 15 लाखांहून अधिक तर दहावीसाठी 16 लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा केंद्रांवर विनापरवाना हालचाली रोखण्यासाठी भरारी पथके आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. तरीही काही ठिकाणी नतद्रष्ट प्रवृत्तींनी डोके वर काढलेच. अमरावती विभागातील 50, छत्रपती संभाजीनगरमधील 33, लातूरमधील 5 आणि नागपूरमधील 4 अशा एकूण 103 कर्मचार्‍यांना घरी बसवण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील इतर विभागांचा विचार करता, बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरमध्ये 46, नागपूरमध्ये 27, मुंबईत 16, लातूरमध्ये 36, नाशिकमध्ये 5 आणि कोल्हापुरात केवळ 1 गुन्हा नोंद झाला आहे. दहावीच्या परीक्षेत पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये 14, छत्रपती संभाजीनगरमध्ये 17, मुंबईत 3, नाशिकमध्ये 2 आणि लातूरमध्ये 9 प्रकरणे समोर आली. कोकण विभागाने मात्र यंदाही ’शून्य कॉपी’ची आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. सांगोल्यात प्रश्नपत्रिकांचे संच चोरीला जाण्यासारख्या गंभीर घटनांनी राज्याला हादरवले असले, तरी अमरावतीतील या मोठ्या कारवाईने संपूर्ण यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button