भारताचा ‘प्लॅन बी’ ठरतोय यशस्वी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख

नवी दिल्ली/23 मार्च – मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा 24 वा दिवस असून स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे देश ऊर्जा पुरवठ्यासाठी आयातीवर निर्भर आहेत त्यांना याचा जास्त फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज संसदेत पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला. मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझमधून टँकर आणणे आव्हानात्मक बनले आहे. भारतात क्रूड, गॅसपासून खतांची आयातही याच देशातून होते. ङझॠ ची 60 टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणि होर्मुझमधील अडथळा मंजूर नाही. सरकार या मार्गावरून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिथल्या प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत: सतर्क मोडला आहे असं त्यांनी सांगितले. तसेच मध्य पूर्वेतील संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि भारत आखाती देशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ऊर्जेचा एक प्रमुख जागतिक स्रोत असलेला पश्चिम आशिया सध्याच्या संकटामुळे प्रभावित झाला आहे. भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.




