मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचे निवेदन
द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधींनी दिली माहिती

नवी दिल्ली/9 ऑक्टोबर : इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी, आज एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यामध्ये, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 10 खासदारांचा समावेश होता. यावेळी, या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी राष्ट्रपतींसोबत झालेल्या संवादाची माहिती दिली. राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत आमची बैठक झाली, मतचोरीबद्दल जेंव्हा बोललो त्यांनी ते डिनाय केलं नाही. मात्र, पुरावे मागितले आहेत. आता, आम्ही त्यांना पुरावे देणार असून उद्या सरन्यायाधींनाही निवेदन देणार असल्याचे राहुल गांधींनी म्हटले.
इंडिया आघाडीच्या नेतृत्वात दोन दिवसांपासून दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि एसआयआर रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इंडिया आघाडीने केली आहे. आमचे दोन्ही मुद्दे जनतेच्या हिताशी संबंधित असून, त्यावर सरकारला योग्य भूमिका घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रपतींना भेटून 10 खासदारांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत आमची बैठक झाली, मतचोरीबद्दल जेंव्हा बोललो त्यांनी ते डिनाय केलं नाही. मात्र, पुरावे मागितले आहेत. देशाला, देशातील विद्यार्थ्यांना माहिती आहे की मतचोरी झालीय. पंतप्रधान हे आर्किटेक्टआहेत, शाह आणि ज्ञानेश कुमार हे इम्प्लिमेंट करणारे आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी एसआयआर आणि व्होटचोरीच्या मुद्द्यावरुनकेंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
ज्ञानेश कुमार लोकशाही संपवत आहेत, असं म्हटल्यावर राष्ट्रपतींनी पुरावे देण्याबाबत म्हटलं. मला मतचोरी झाली याचे पुरावे हवे आहेत. त्यावर, देशभरात पुरावे आहेत, आम्ही तुम्हाला पुरावे देऊ, असे आम्ही राष्ट्रपतींना सांगितल्याची माहिती राहुल गांधींनी दिली. आम्हाला आंदोलन करताना ताब्यात घेण्यात आलं, असेही राष्ट्रपतींना सांगण्यात आले. दरम्यान, आता, सर्वोच्च न्यायालयाकडे आम्ही आता सोमवारी जाणार आहोत. जे निवेदन राष्ट्रपतींना दिले तेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना सुद्धा देणार आहोत, असेही राहुल गांधींनी सांगितले.





